आजचा युवक आणि तारुण्यभान

              आजचा तरुण आणि त्याचे तारुण्यभान याविषयी आज खूप चर्चा होताना दिसते. तसे पाहिले तर प्रत्येक पिढीमध्ये तरुण आणि त्यांच्या वागण्या-बोलण्याची चर्चा होताच असते. तरीही आज मात्र आम्हा तरुणांच्या या नव्या पिढीविषयी खूपच चर्चा होताना दिसते. याचे कारण आजचे बहुतांशी तरुण दिशाहीन आणि व्यसनाधीन आहेत. आजचे तरुण दिशाहीन आहेत येथपासून ते पाश्चात्यांच्या अंधानुकरणांमुळ वेगवेगळ्या वाईट व्यसनांमध्ये अडकले आहेत इथपर्यंत त्यांच्यावर आरोप आहेत. या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे हे आजच्या तरुणाईन अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. हा आरोप आजच्या सरसकट तरुणाईवर अन्याय करणारा असला तरी त्यातील काही भाग खराही आहे. आजच्या आम्हा तरुणांना मिळणारे स्वातंत्र्य, मिळणारा रोजचा पॉकेटमनी, बदललेल्या वातावरणारा होणारा मनावरील प्रभाव, प्रत्येक क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धा, पालकांच्या व समाजाच्या वाढलेल्या अपेक्षा, आजूबाजूचे भ्रष्टाचारी, मूल्यहीन समाजजीवन, प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव, सुशिक्षित बेकारीमुळे होणारा तरुणांचा कोंडमारा या सर्वांचा परिणाम तरुणांच्यावर होण स्वाभाविकच आहे. पण यातूनही आम्ही तरुणांनी जीवनाचा योग्य मार्ग पत्करणे गरजेचे आहे अस मला वाटत. कारण आम्हा तरुणांवरच आपल्या राष्ट्राच भवितव्य अवलंबून आहे. भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या २०२० सालच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर तरुणांनी आपली कर्तव्ये ओळखून भारतासह जगाचे नेतृत्व करायला सिद्ध व्हायला हवे. यासाठी आपण तरुणांनी जीवन जगताना जागरूक राहून, ध्येय निश्चित करून वाटचाल करायला हवी.
               स्वातंत्र्यपूर्वकाळात आणि त्याच्याही पूर्वी भारत देशात अनेक आदर्श तरुण होऊन गेले. ज्ञानेश्वरांपासून ते विवेकानंदांच्या पर्यंत छत्रपती शिवरायांपासून ते राजर्षि शाहू राजापर्यंत आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यवीरांपर्यंत या सर्व तरुणांनी समाज, देश घडविला म. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या समाजसुधारकांनी आणि सी. व्ही. रामन, जगदीशचंद्र बोस ते डॉ. जयंत नारळीकर यासारख्या वैज्ञानिकांनी हा देश घडविला हे दीपस्तंभ आहेत. आज आम्हा तरुणांसमोरील हे आदर्श कमी होत आहेत. हे खरे आहे तरीही पूर्वीच्या या महात्म्यांच्या आचार-विचारांचा वारसा आपण जोपासून तो पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे.

आजचा तरुण दूरदर्शनच्या, भ्रमणध्वनीच्या, दारू, चरस, अफ्फू, गांजा सारख्या दुर्व्यसनाच्या आहारी जाताना दिसतो आहे. ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे’ याचे भान आम्हा तरुणांना असायला हवे. जीवनातील अनेक संकटांना धैर्याने सामोरे जाऊन ताठ मानेने उभे राहणे हे तारुण्याचे लक्षण हवे. नाहीतर थोड्याश्या अपयशाने खचून जाऊन लैंगिक विकृती, वाईट व्यसने, माथेफिरू विचार या गर्तेत आजचा तरुण सापडताना दिसतो आहे. रोजचे वर्तमानपत्र उघडले की वाऱ्याच्या वेगाने जाणाऱ्या तरुणांचा अपघाती मृत्यू, मोबाईलवर सेल्फी घेताना तरुणाचा मृत्यू, वाईट व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांचा मृत्यू, आई-वडील, शिक्षक अभ्यासासाठी बोलले म्हणून आत्महत्या असेच तरुणांच्या मृत्यूचे थैमान माजविणाऱ्या बातम्या वाचल्या, पाहिल्या की अंगाचा थरकाप होतो आणि मन अंतर्मुखही बनते. मृत्यूचे हे थैमान असेच सुरु राहिले तर भारत हा तरुणांचा देश राहणार का ? असा प्रश्न पडतो.
                    महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेताना युवा महोत्सव, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना या माध्यमातून आम्हा तरुणांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करून घ्यायला हवा. तसेच पूर्वीच्या भारतवर्षातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्वांच्या आदर्शांचे अनुकरण आजच्या आम्हा तरुणांनी करायला हवे. तर आणि तरच आजची आपली तरुण पिढी भारताचे भवितव्य घडवू शकते. तरुणांनी आपले स्व-चारीत्र्य घडवून राष्टीय चारित्र्यास हातभार लावावा. तसेच आपले तारुण्यभान जपून विधायक कार्य करावे तरच आपला आदर्श वारसा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहचवू शकतो असे मला वाटते.


- सत्यजित संजय पाटील
एम.एस्सी. भाग २,
भौतिकशास्त्र विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
मो. ९४०३६७२६७१
ई-मेल : satyajeet1396@gmail.com 

Comments

Popular posts from this blog

आमची अविस्मरणीय सहल

माझा गाव