आमची अविस्मरणीय सहल
आम्ही बी.एस्सी. पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना आमची सहल आमच्या भौतीकशास्त्र विभागामार्फत म्हैसूर बेंगलोर या ठिकाणी घेऊन जायचं ठरलं. अर्थात सहल ही शैक्षणिक व मनोरंजन अशा दोन्ही साच्यात बसणारी होती. दोन महिने आधी सर्वांची रेल्वेची तिकिटे काढण्यात आली होती. सर्वांची तिकिटे एकत्र काढण्यात काही प्रमाणात यश आले होते.
पाचवी सेमिस्टर होऊन काहीच दिवस झाले होते. सर्वांना आता सहलीचे वेध लागले होते. दि. २७ डिसेम्बर २०१६ रोजी आम्ही कोल्हापूरहून हरिप्रिया रेल्वेने मिरजपर्यंत व तेथून सुवर्ण जयंती एक्सप्रेसने म्हैसूरकडे कूच केली. माझा तर रेल्वेमधून हा प्रथमच प्रवास होता त्यामुळे मी खूपच उत्सुक होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हैसूरमधून आम्ही लगेच २८ सीटर गाडीने कुर्गकडे प्रस्थान केले. वास्तवत: कुर्ग हे थंड हवेचे ठिकाण असून भारतातील स्कॉटलँड म्हणून देखील ते प्रसिद्ध आहे. तेथील ऐतिहासिक तिबेटीयन बुद्धलोकांचे सुवर्ण मंदिर लक्षवेधी आहे. दुपारच्या वेळी आम्ही तेथे उपलब्ध असलेला रिव्हर राफ्टींग हा साहसी खेळ खेळण्यासाठी कावेरी नदीतील पाण्यात उतरलो, अर्थात सर्व काही सुरक्षीततेची काळजी घेऊनच केले जात होते. त्यावेळी आम्ही आमचे दोन गट करून बोटिंगच्या स्पर्धा देखील घेतल्या.
त्यानंतर आम्ही मडिकेरी येथील चॉकलेटसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बाजारात जाऊन मनसोक्त खरेदी केली. तेथेच जवळ असणाऱ्या मडिकेरी किल्ल्याला व त्याला लागून असणाऱ्या वस्तू संग्रहालयाला भेट दिली. तेथे खूप पुरातन व मौल्यवान वस्तूंचे छान पद्धतीने जतन केले जात आहे. त्यानंतर आम्ही राजा बागेतून लक्षवेधी सूर्यास्त पाहिला. त्या दिवशी आम्ही कुशलनगरमध्ये वस्ती केली.
सहलीच्या तिसऱ्या दिवशी पहाटे आम्ही गाडीने म्हैसूरकडे रवाना झालो. प्रथमतः आम्ही म्हैसूरचा ऐतिहासिक व भव्य असा राजवाडा पाहिला. तेथील राजवाड्याची दालने, दरबार, चित्रकारांनी काढलेली चित्रे पाहून मन थक्क होते. त्यानंतर जेवन करून आम्ही प्राणी-पक्षी संग्रहालय पाहायला गेलो. तेथे पशुपक्षी पाहून जैवविविधतेची प्रचीती येते. त्यानंतर सायंकाळच्या वेळी वृंदावन बाग पाहायला जात असताना आम्ही रस्ता चुकलो. दोन तासांचा रस्ता पण तेथे पोहोचण्यासाठी आम्हाला चार तास लागले. आम्ही रात्री साडे सातच्या सुमारास तेथे पोहोचलो. कृष्णराजसागर धरणाच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या वृंदावन बागेचे सौंदर्य भारतभर चर्चेत आहे. आम्ही तेथील रंगीबेरंगी प्रकाशात गाण्यावर डोलणारे कारंजे पाहण्यात मंत्रमुग्ध झालो. तेथे विविध चित्रपटांचे चित्रीकरण झालेल्या विविध जागाही पाहिल्या. रात्रीची बागेतील रोशनाई नयनरम्य होती. तेथील वातावरणाने स्वर्ग सुखाची अनुभूती आली.
सहलीच्या चौथ्या दिवशी सकाळी एका चर्चला भेट देऊन आम्ही बेंगलोरसाठी रवाना झालो. तेथील राधा व कृष्णाचे इस्कॉन मंदिर फार सुंदर आहे. बेंगलोरमधील विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तांत्रिक संग्रहालयाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक आहे. तेथे गेल्यानंतर वेळेचे भानच राहत नाही. प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगणारे प्रयोग त्यांनी मांडले होते. अर्थातच आकर्षक मांडणीमुळे ती संकल्पना चटकन समजत असे.
त्या दिवशी रात्री आम्ही राणी चेन्नम्मा एक्सप्रेस या रेल्वेने कोल्हापूरास प्रयाण केले आणि काही दिवसांची ही सहल पूर्ण झाली. आम्ही सर्वांनी खूप धमाल केली.
- सत्यजित संजय पाटील
मो. ९४०३६७२६७१
ई-मेल : satyajeet1396@gmail.com
Comments
Post a Comment